भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत भारतात कधीकधी आणि कशी युद्धं झाली आणि नागरिकांना कसं स्वातंत्र्य मिळालं याबाबत सांगितलं. पण या युद्धांच्या या क्रमवारीत त्यांनी अशा एका युद्धाचा उल्लेख केला जे १६ मे २०१४ रोजी सुरू झालं. ते युद्ध हिंदुत्वाचं युद्ध असल्याचा उल्लेख स्वामी यांनी केला. १६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला होता.

“ब्रिटीश साम्राज्यवादापासून भारताच्या मुक्तीसाठी पहिलं युद्ध १८५७ मध्ये झालं होतं. दुसरं युद्ध २१ ऑक्टोबर १९४३ रोजी झालं होतं. त्यानंतर पश्चिमीकरणापासून देशाला मुक्त करण्यासाठी देशात तिसरं युद्ध १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरू झालं आणि १६ मे २०१४ रोजी हिंदुत्वासाठीच्या युद्धाची सुरूवात झाली,” असं स्वामी म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

धोनीबाबतही केलं होतं ट्विट

धोनीच्या निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. “एम.एस.धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे आणि अन्य कोणत्याही बाबींमधून निवृत्ती घेत नाही. त्यानं जे कौशल्य आणि संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असं स्वामी म्हणाले. परंतु यावेळी स्वामी यांनी धोनीनं कोणत्या पक्षाकडून लढलं पाहिजे, याबाबत मात्र वक्तव्य केलं नाही.