ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या माध्यमातून मतदान घेताना अनेक तांत्रिक अडचणी तसेच मतदान यंत्रांसोबत छेडछेड होत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्याऐवजी ते मतपत्रिकांद्वारे घेण्यात यावे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. या कारणामुळे वारंवार भाजपाला टार्गेटही केले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या दिल्लीत सुरु असलेल्या महाअधिवेशनातही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यापार्श्वभूमीवर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी सांगितले की, जर सर्व राजकीय पक्षांची इच्छा असेल तर आगामी निवडणुका या मतदान यंत्राद्वारे घेण्याऐवजी मतपत्रिकांद्वारे घेण्याचा विचार करण्यात येईल.


राम माधव म्हणाले, मला काँग्रेसला सांगावेसे वाटते की, मतपत्रिकेऐवजी ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्याचा निर्णय हा मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांच्या सहमतीनेच घेण्यात आला होता. मात्र, आता जर प्रत्येक पक्षाला वाटत असेल की मतदान हे मतपत्रिकेद्वारेच घ्यायला हवे तर, यावर देखील आम्ही विचार करु. लोकसभा निवडणुकांनंतर उत्तरप्रदेशसह ५ राज्यांतील निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाडी झाल्याचे आरोप केले होते. इतकेच नाही तर गुजरामधील निवडणुकांमध्येही पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्याबरोबर अनेक लोकांनी ईव्हीएमच भाजापाच्या विजयाचे कारण असल्याचे म्हटले होते.

त्याचबरोबर, नुकतेच उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले होते की, जर ईव्हीएममध्ये छेडछाड झाली नसती तर आमच्या उमेदवारांच्या विजयामध्ये मोठे अंतर असते. दरम्यान, काँग्रेसच्या महाअधिवेशनात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याबाबतचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. जगातील मोठ्या लोकशाही देशांत अजूनही मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाते. यामुळे निवडणुक प्रक्रियेमध्ये लोकांची विश्वसनीयता वाढीस लागेल.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर विरोधकांकडून ईव्हीएम छेडछाडीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांदरम्यान अनेक मतदान यंत्रांमध्ये पहिल्यापासूनच भाजपाच्या खात्यात मतं पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर निवडणुक अधिकाऱ्यांनी या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण दिले होते. विशेषतः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी ३२५ जागांवर भाजपाने जिंकल्यानंतर बसपा सुप्रीमो मायावती यांच्यासह काँग्रेस आणि सपाने देखील ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्यामुळेच भाजपाचा विजय झाल्याचे म्हटले होते.