मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या सुटकेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधले होते. या टीकेला सोमवारी मोदींनी गुजरातमधील सभेत उत्तर दिले होते. यानंतर आता केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी २०१० मधील एका घटनेवरुन राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. ‘लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईदपेक्षा हिंदू दहशतवादापासून देशाला सर्वाधिक धोका असल्याचे राहुल गांधींनी २०१० साली म्हटले होते,’ असे प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले.

गेल्याच आठवड्यात हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका झाल्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीची खिल्ली उडवली होती. ‘नरेंद्र भाई, गळाभेट कामी आली नाही. आणखी गळाभेटी घेण्याची गरज आहे,’ असे गांधींनी म्हटले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी २०१० मधील एका घटनेचा संदर्भ दिला. ‘२०१० मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन भारतात आल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. राहुल गांधी त्यावेळी तिथे उपस्थित होते. तेव्हा अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर यांनी राहुल गांधींना त्यांचे लष्कर-ए-तोयबाबद्दलची भूमिका विचारली. त्यावेळी ‘तो विषय सोडा, भारतातील हिंदू दहशतवाद जास्त धोकादायक आहे,’ असे राहुल गांधींनी म्हटले होते,’ असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी राहुल गांधी यांच्या या विधानाचे वृत्तांकन केले होते, असेही ते प्रसाद यांनी म्हटले. त्यांनी याबद्दल ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिलेले संपूर्ण वृत्तच पत्रकारांना वाचून दाखवले. ‘विकिलिक्सनुसार, लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद जास्त धोकादायक असल्याचे विधान राहुल गांधींनी केले आहे. अमेरिकेच्या राजदूतांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी ही भूमिका मांडली,’ असा बातमीतील मजकूर प्रसाद यांनी वाचून दाखवला. ‘त्यावेळी राहुल गांधींना लष्कर-ए-तोयबा आणि हाफिज सईदपेक्षा हिंदू दहशतवादी गटांची जास्त भीती वाटत होती,’ असेही प्रसाद यावेळी म्हणाले.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले केले जात आहेत. राहुल गांधींनी हाफिज सईदच्या सुटकेवरुन मोदींवर केलेल्या टीकेला पंतप्रधानांनी सोमवारी उत्तर दिले. ‘हाफिज सईदच्या सुटकेनंतर काँग्रेसचा आनंद गगनात मावेनासा झाला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राहुल गांधींवर पलटवार केला.