मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला ३ वर्ष पूर्ण झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला.

“तुम्ही कशाचा जल्लोष करत आहात? तुम्ही तर दिलेली वचनं मोडली आहेत” अशा कडक शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. त्यांच्या या विधानावर केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन् यांनी टीका करत त्यांनाच प्रतिप्रश्न विचारला आहे.

“आम्ही कुठली वचनं मोडली? आम्ही आमच्या जाहीरनाम्यातल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करत आहोत” सीतारामन् म्हणाल्या.

“राहुल गांधींना कोणीतरी चुकीची माहिती पुरवत आहे असं वाटतंय. त्यांचेच आरोप मी स्वीकारू शकत नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी पीटीआयकडे नोंदवली.

राहुल गांधींनी मोदी सरकारवर ‘नॉन परफॉर्मन्स’चा ठपका ठेवला. त्यावरही निर्मला सीतारामन् चांगल्याच खवळल्या.
‘नॉन परफॉर्मन्स? हे कोण बोलतंय?” निर्मला सीतारामन् म्हणाल्या “हे स्वत:च गेली १० वर्ष एका ‘नाॅन परफाॅर्मिंग’ सरकारचा एक भाग होते. त्यांच्या या सरकारच्या कारभारामुळे जगभर भारतात सरकार आहे की नाही असाच प्रश्न सगळेजण विचारत होते” सीतारामन् कडाडल्या
त्यांना भारताचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम् यांच्या उद्गारांविषयी विचारलं असताना त्यांनी “कायदा आपलं काम करत आहे.” असं उत्तर दिलं.
पी. चिदंबरम् यांच्या चेन्नईमधल्या घरावर सीबीआय़ने छापा टाकला. त्यावेळी ‘सरकार सीबीआयचा वापर करत माझा आवाज दडपू शकत नाही” असं त्यांनी म्हटलं होती. पण याचं खंडन करताना निर्मला सीतारामन् यांन ‘कायदा आपलं काम करत आहे’ असं म्हटलं. एकंदरीतच भाजपकडून राहुल गांधींना खरमरीत उत्तर दिलं गेलं आहे.

[jwplayer 6emyBwaS]