राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तिसऱ्या प्रकरणात आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाखांचा दंड ठोठावला. पण लालूंचे चिरंजीव आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हा भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कट असल्याचा आरोप करत याप्रकरणी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचेही म्हटले.

लालूंना या प्रकरणात फसवल्याचे बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि खासकरून नितीश कुमार लालूंना फसवण्यामागे लागले आहेत. कशाही पद्धतीने लालूजींना अडकवायचे हे त्या लोकांचे टार्गेटच आहे. बिहारच्या विकासाऐवजी हे लोक लालूंना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.

इथे लोकांमध्ये खूप राग आहे. पण हा न्यायालयाचा निर्णय आहे, त्याचा आम्ही सन्मान करतो. आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयातही जाणार आहोत. उच्च न्यायालयात आम्हाला दिलासा मिळेल अशी आशा आहे. तर दुसरीकडे आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसादसिंह यांनीही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी लालूंवर टीकास्त्र सोडले. हा तर न्यायालयाचा निर्णय आहे. आम्हाला तर हेही माहीत नाही की, कोणत्या न्यायाधीशाने हा निकाल दिला आहे. जनतेला भ्रमित करण्यासाठी आरजेडी लालूंच्या शिक्षेप्रकरणात भाजपला ओढत आहे. लालूंच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला होता आणि आता न्यायालयाने निकाल दिला आहे. या संपूर्ण प्रकारणात भाजपचा संबंध येतो कुठं. आता लालू खासदार-आमदार काय सरपंचाची निवडणूकही लढू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.