25 March 2019

News Flash

भाजपा सत्तेत आल्यास हैदराबादचंही नामांतर होणार!

तेलंगणामध्ये भाजपाची सत्ता आल्यास हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तिंची नावं ठेवण्याचं आश्वासन

Charminar,Famous monument in hyderabad,India

जर तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावं बदलून थोर व्यक्तिंची नावं ठेवण्यात येतील असं आश्वासन भाजपाचे नेते राजा सिंग यांनी दिलं आहे. “भाजपाचं सरकार तेलंगणात जर सत्तेत आलं तर आमचं पहिलं प्राधान्य विकासाला असेल. तर दुसरं प्राधान्य हे शहरांची नावं बदलण्याला असेल. शहरांची नावं थोर व्यक्तिंची असली पाहिजेत. ज्यांनी राष्ट्रासाठी, तेलंगणासाठी व समाजासाठी कार्य केलंय अशा थोरांची नावं शहरांना द्यायला हवीत,” राजा सिंग यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

तेलंगणाच्या विसर्जित करण्यात आलेल्या विधानसभेचे राजा सिंग सदस्य होते. त्यांनी सांगितलं की सोळाव्या शतकात या प्रदेशावर राज्य केलेल्या कुतुबशाहींनी भाग्यनगर शहराचं नाव बदलून हैदराबाद केलं. त्यांनी अन्य काही शहरांची नावंही बदलली. सिकंदराबाद व करीमनगर यांचं उदाहरण त्यांनी दिलं. अमित शाह यांना मुस्लीममुक्त भारत हवाय या असदुद्दिन ओवेंसींच्या वक्तव्याचाही राजा सिंग यांनी समाचार घेतला. तेलंगणाच्या विरोधातही यापूर्वी बोललेल्या ओवेसींवर मुस्लीमांनी विश्वास ठेवू नये असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या सरकारनं तिथल्या शहरांची नावं बदलल्याचं उदाहरण समोर आहे. फैजाबाद जिल्ह्याचं नामांतर अयोध्या करण्यात आलं आहे. अलाहाबादचंही नामांतर करुन त्याला प्रयागराज नाव देण्यात आलं आहे. याशिवाय भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती असे करण्याचा मानसही व्यक्त केला आहे. तेलंगणामध्ये किंवा आधीच्या आंध्र प्रदेशमध्ये आत्तापर्यंत भाजपाला सत्ता मिळालेली नाही. आता तिथं निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. असदुद्दिन ओवेसी हे एमआयएमचे हैदराबाद मतदारसंघात निवडून आलेले खासदार आहेत. तर तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

First Published on November 9, 2018 11:24 am

Web Title: bjp says it would change the name of hyderabad if forms government