पक्षातील खासदाराचाच आरोप; भाजपकडून मात्र इन्कार

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपच्या खासदाराने पक्षाला चांगलेच अडचणीत आणले आहे. पक्षाचे विद्यमान आमदार आणि सच्चे कार्यकर्ते यांना डावलून गुन्हेगारांना तिकिटे विकण्यात आल्याचा आरोप खासदार आर. के. सिंह यांनी केला. मात्र पक्षाने हा आरोप निराधार आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
आर. के. सिंह हे माजी केंद्रीय गृहसचिव आहेत. भाजपने गुन्हेगारांना तिकिटे दिली असल्याने हा पक्ष आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यात काहीच फरक राहिलेला नाही, असे सिंह म्हणाले. लालूप्रसाद यांच्यावर भाजप सातत्याने ‘जंगल राज’ची टीका करीत आला आहे.
पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच गुन्हेगारांना तिकिटे देण्यात आली, हा बिहारच्या जनतेवर अन्याय आहे, काही जणांनी तिकिटे विकली, हे काय चालले आहे, आम्हाला स्वच्छ प्रशासन कसे मिळणार, असे सवालही सिंह यांनी उपस्थित केले आहेत. गुन्हेगारांना तिकिटे देण्यात आली, बिहारला तुम्ही स्वच्छ प्रशासन कसे देणार, गुन्हेगारांना तिकिटे का देण्यात आली, त्याची कारणेही देण्यात आली नाहीत, लालूप्रसाद यादव आणि भाजपमधील नेत्यांमध्ये फरक तो काय, अशी टीकाही सिंह यांनी केली.
लोकजनशक्ती पक्ष सिंह यांच्या आरोपांशी सहमत
खासदार आर. के. सिंह यांच्या आरोपांशी सहमत असल्याचे लोकजनशक्ती पार्टीने (एलजेपी) म्हटल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मात्र त्यामुळे एनडीएच्या निवडणूक यशावर काहीही परिणाम होणार नाही, ही भाजपची अंतर्गत बाब आहे, अशी सारवासारव लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी केली आहे.

निवडणुकीपूर्वी कारवाई नाही!
सिंह यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करणारी वक्तव्ये केली असली, तरी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे संकेत सूत्रांनी दिले. सिंह हे आरा मतदारसंघातील खासदार आहेत.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आल्याचा स्वपक्षीय खासदार आर. के. सिंह यांचे आरोप निराधार आहेत. भाजपमध्ये सर्व घटकांचा विचार करूनच उमेदवारी दिली जाते.
राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री