24 January 2021

News Flash

BLOG – अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भाजपाचे ‘पर्सन विथ डिफरन्स’

आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांची राजकीय सभ्यता आणि सुस्कृंतपणा. अटल बिहारी वाजपेयी हे पक्षीय

(संग्रहित छायाचित्र)

दीनानाथ परब

राजकारणात सभ्यता, प्रामाणिकपणा, सत्यता, एकनिष्ठता आणि उदारता या गुणांना खूप महत्व असते. पण सध्याच्या राजकारणात हे गुण वेगाने लुप्त होत चालले आहेत. विरोधकांनी संसदेत किंवा विधानसभेत कोंडी केल्यानंतर त्यांना शत्रूत्वाच्या भावनेतून द्वेषपूर्ण वागणूक देण्याचे प्रकार वाढत आहेत. आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यामागचे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्यांची राजकीय सभ्यता आणि सुस्कृंतपणा. राजकारणात सक्रीय झाल्यानंतर नेत्याचे वर्तन कसे असावे, सर्वोच्च सत्तास्थानी असताना राजकीय अजेंडा बाजूला ठेऊन राजधर्माचे पालन कसे करावे, वादग्रस्त विषयांवर भूमिका कशी मांडावी, विरोधकांना जिंकून सभागृहातील कोंडी कशी फोडावी याचा उत्तम वस्तुपाठ वाजपेयींनी घालून दिला.

अटल बिहारी वाजपेयी हे पक्षीय राजकारणापलीकडचे नेते होते. ते भाजपाचा चेहरा असले तरी सर्वपक्षीय नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराचे स्थान होते. असा अजातशत्रू असलेला नेता आजच्या काळात सापडणे दुर्मिळ आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने देशाचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. हे वाक्य आपण कालपासून अनेकवेळा ऐकले असेल पण त्या वाक्याचा मूळ अर्थ दडलाय तो वाजपेयींच्या व्यक्तिमत्वामध्ये. असा गुणी, संपन्न नेता पुन्हा होणे नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतीय राजकारणाचा अनुभव असलेल्या वाजपेयींनी आपला प्रदीर्घ काळ विरोधी बाकांवर घालवला. पण सत्ता मिळाल्यानंतर वाजपेयींनी नैतिकतेची कास कधीच सोडली नाही.

१९९९ सालच्या एप्रिल महिन्यात जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे वाजपेयींचे सरकार अवघ्या एका मताने कोसळले. बऱ्याचवर्षांच्या संघर्षानंतर भाजपाला केंद्रात सत्ता मिळाली होती. खरंतर भ्रष्ट मार्गांचा अवलंब करुन वाजपेयींना सरकार टिकवता आले असते. पण वाजपेयींनी सत्तेसाठी आयुष्यभर जोपासलेली तत्वे, मुल्ये सोडली नाहीत. लोकशाही तत्वाचे पालन करत त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सत्ता टिकवणे सहज शक्य असतानाही फक्त तत्वांसाठी सर्वोच्च पद सोडणारा नेता देशात सापडणार नाही. आपल्या कृतीतून वाजपेयींनी भारतीय राज्यकर्त्यांसमोर उत्तम उदहारण सादर केलेच पण पार्टी विथ डिफरन्स ही भाजपाची ओळख अधिक प्रखर केली. आज नरेंद्र मोदी-अमित शहांच्या नेतृत्वाखालील भाजपा तत्व, नैतिकतेच्या राजकारणापासून बराच दूर गेला आहे पण वाजपेयींच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळेच भाजपाला पार्टी विथ डिफरन्स ही ओळख निर्माण करता आली.

उदारता
अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्वभावातील आणखी एक मोठा गुण होता तो म्हणजे त्यांची उदारता. राजकारणात विरोधकांचे कौतुक करण्यासाठी मोठे मन लागते तो गुण वाजपेयींकडे होता. जनतेच्या हिताच्या मुद्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांबरोबर कधीच तडजोड केली नाही. शब्दांचा शस्त्रांसारखा वापर करुन त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपासून ते इंदिरा गांधींच्या सरकारला अक्षरक्ष: जेरीस आणले. पण चांगल्या गोष्टींसाठी त्यांनी सत्ताधाऱ्यांचे मनापासून कौतुकही केले. १९७१ सालच्या बांगलादेश युद्धात भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर वाजपेयींनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींना ‘अभिनव चंडी दुर्गेची’ उपमा दिली होती. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनातून पंडित जवाहरलाल नेहरुचे चित्र हटवले होते. ही बाब वाजपेयींच्या ध्यानात येताच त्यांनी ते चित्र पुन्हा मूळ जागी लावायला लावले.

१९९८ साली राजस्थान पोखरण रेंजमध्ये झालेल्या अणू स्फोटांचे श्रेय वाजपेयींना दिले जाते. पण वाजपेयींनी याचे श्रेय दिवंगत पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांना दिले. नरसिंह राव यांच्या मृत्यूनंतर वाजपेयींनी हा खुलासा केला. अणवस्त्र कार्यक्रमाची सुरुवात नरसिंह राव यांच्या काळातच झाली होती. राव यांनी मला ही गोष्ट सार्वजनिक करु नको असे सांगितले होते अशी आठवण वाजपेयींनी सांगितली. इतका उदार, निस्वार्थी, कवी मनाचा संवेदनशील राजकारणी पुन्हा होणे नाही. अटल बिहारी वाजपेयींनी आपली संपूर्ण हयात हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षात घालवली पण ते हिंदुत्ववादी नेते असल्याचा शिक्का कधीच त्यांच्यावर बसला नाही हेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकारणाचे वैशिष्टय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2018 5:21 pm

Web Title: bjp senior leader atal bihari vajpayee person with diffrence
Next Stories
1 Kerala floods: पुढील सात दिवस केरळमध्ये मोफत दुरध्वनी सेवा
2 Kerala floods: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चिमुकल्याला वाचवणाऱ्या या जवानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
3 जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद, महिलेचाही मृत्यू
Just Now!
X