दोन दिवसांपासून राजस्थानमध्ये सत्तानाट्य सुरू आहे. तर दुसरीकडे काही जणांना भाजपा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, राजस्थानमधील सत्तानाट्यावर भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजस्थानमधील ही परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल,” असं त्या म्हणाल्या.

मध्यप्रदेशातील सत्ता गेल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेचे ढग घोंगावू लागले आहे. घोडेबाजाराच्या प्रकरणात नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत गेले होते. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्याला एक वेगळंच वळणं मिळालं होतं. दरम्यान, राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय नाट्याला उमा भारती यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार धरलं आहे.

“सध्या निर्माण झालेलं संकट हे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळेच निर्माण झालेलं आहे. ते तरूणांना अपमानित करतात. ते स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत. त्यांच्या पाठीपाठी करणाऱ्यांनाच सरारमध्ये राहावेत अशी त्यांची इच्छा असते,” असं उमा भारती म्हणाल्या. “तरूण आणि बुद्धीवान नेत्यांना त्यांनी एवढा अपमान केला की तो त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सचिन पायलट हे राजेश पायलत यांचे सुपुत्र आहेत. राजेश पायलट हे माझ्या भावासारखे होते. आमचे कौटुंबीक संबंध आहेत आणि सचिन पायलट हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत हे मला माहित आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल,” असंही त्यांनी नमूद केलं.