आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरूवारी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. देशातील १५० अशा जागा आहेत, जिथे भाजपचा पराभव झाला होता. तिथे विजयासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत, असे शहा यांनी बैठकीत म्हटले. या जागांसाठी त्यांनी सादरीकरणही केले. या बैठकीत एकूण ३१ नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. या जागा निवडून त्यावर पुढील दोन वर्षे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांविषयी मंत्र्यांकडून माहिती मागवली. भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत अनेक मंत्री सहभागी झाले होते. शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांनी आपले मत नेत्यांसमोर बोलूनही दाखवले.

या वेळी बैठकीत अनंत कुमार, रवीशंकर प्रसाद, नरेंद्रसिह तोमर, जे.पी.नड्डा, पीयूष गोयल, धर्मेंद प्रधान, निर्मला सीतारमण, मनोज सिन्हा, प्रकाश जावडेकर आणि अर्जुन मेघवाल आदी नेते सहभागी झाले होते. अमित शहा यांनी सर्व मंत्री आणि नेत्यांकडून मतदारसंघांविषयी माहिती जाणून घेतली.

विविध राज्यातील काही नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पक्षाकडून मंत्र्यांना अनेक जबाबदार दिल्या होत्या. यामध्ये दलितांच्या घरी जेवणाचाही समावेश होता. या सर्व कार्यक्रमांबाबत माहिती घेण्यात आली. बैठकीत पुढील लोकसभा निवडणुकीत ३५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.

या सादरीकरणात पश्चिम बंगाल, ओडिश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक राज्यातील जागांचा खास उल्लेख करण्यात आला. या सर्व राज्यांमध्ये पक्षाला आपली कामगिरी सुधारायची आहे. त्यामुळे या राज्यातील जागांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

बैठकीतील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीत सहभागी होण्यापूर्वी मंत्री आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. बैठकीनंतरही कोणत्याच नेत्याने यासंबंधी माध्यमांशी चर्चा केली नाही. भाजपने २०१४ च्या निवडणुकीत २८४ जागांवर विजय मिळवला होता.