02 March 2021

News Flash

अरुणाचल प्रदेशमधील सत्तेत भाजपलाही वाटा

अरुणाचलमधील भाजप नेते तामियो तागा यांना खांडू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

पेमा खांडू यांच्या मंत्रिमंडळात भाजपलाही स्थान मिळणार आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये पेमा खांडू यांच्या मंत्रिमंडळात आता भाजपलाही संधी मिळणार आहे. अरुणाचलमधील भाजप नेते तामियो तागा यांना खांडू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. देशभरात भाजप सत्ताधारी असलेले अरुणाचल १४ वे राज्य ठरले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे सर्वच आमदार पीपल्स पार्टीत दाखल झाल्याने अरुणाचलमध्ये पेमा खांडू यांच्या सरकारला धोका निर्माण झाला नाही. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्ष भाजपप्रणित पूर्वोत्तर विकास आघाडीतील घटक पक्ष आहे. २५ खासदार देणा-या पूर्वोत्तर राज्यांवरील पकड मजबूत करण्यासाठी भाजपने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करुन या आघाडीची स्थापना केली होती.

पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आता भाजपही सहभागी होणार असून लवकरच भाजपचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. भाजप सत्तेत आल्यास अरुणाचल प्रदेशला स्थैर्य प्राप्त होईल असा विश्वास पेमा खांडू यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेश हे भाजप सत्तेत असलेले चौदावे राज्य ठरणार असून मित्रपक्षांसोबत भाजप सत्तेवर असलेले हे सहावे राज्य आहे.
६० आमदार असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचे ४३ आमदार, भाजपचे ११ आमदार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. २ आमदार अपक्ष असून तीन जागा अजूनही रिक्त आहेत.
अरुणाचल प्रदेशमधील राजकारण गेल्या दीड वर्षांपासून ढवळून निघाले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये याची सुरुवात झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी विधानसभा अध्यक्षांपासून ते महत्त्वाची मंत्रीपदे निकटवर्तीयांकडे ठेवली. त्यामुळे इतर गट नाराज झाले. त्यातच नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच पुनर्रचना करण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या कालिखो पूल यांनी बंडखोर आमदारांसह सत्ताबदल घडवण्याचा प्रयत्न केला होता. दोन महिन्यांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार आले आणि पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्या महिन्यात पेमा खांडू यांनी पीपीएत प्रवेश केल्याने अरुणाचलमध्ये पुन्हा एकदा सत्ताबदल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:08 pm

Web Title: bjp set to have a minister in arunachal govt will be state no 14 in party kitty
Next Stories
1 पुणे मेट्रोच्या मंजुरीचा प्रवास अंतिम टप्प्यात; पीआयबीचा हिरवा कंदील
2 मोदीनितीला चिनी शह, चीन बांगलादेशला देणार २४ बिलीयन डॉलरचे कर्ज
3 पुन्हा मैत्रीचे वारे; भारत-रशियात होणार अब्जावधी डॉलरचा संरक्षण करार
Just Now!
X