माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न सिन्हादेखील भाजपाला लवकरच सोडचिठ्ठी देतील, अशा बातम्या येत होत्या. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट भाजपावर नाराज असलेले पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिन्हा यांनी आपल्या पक्षालाच आव्हान दिलं आहे. पक्षाने माझ्यावर कारवाई करुन दाखवावी असं ते म्हणाले आहेत.

पाटणामधील श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये आयोजित राष्ट्रमंच अधिवेशनात सिन्हा बोलत होते. ”माझ्यावर कारवाई करण्याचा गेल्या बिहार विधानसभा निवडणुकांपासून ‘त्यांचा’ विचार सुरू आहे. पण ‘त्यांची’ परिस्थिती इतकी दयनिय झालीये की, यासाठी त्यांना मुहूर्त पाहावा लागतोय”, असं ते म्हणाले. ”त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते मला पक्षातून काढण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण न्यूटनचा तिसरा नियम लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया ही उमटतच असते” असा इशाराही सिन्हा यांनी दिला.

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी मंचावरून लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची त्यांनी मुक्तकंठाने स्तुती केली. तेजस्वी यादव यांचे बिहारच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाचे स्थान असेल, असं भाकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी वर्तवलं. यावेळी बोलताना , यशवंत सिन्हांच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. देशाच्या राजकारणात यशवंत सिन्ह यांचे मोठे योगदान असून त्यांनी राजकारणात अनेक त्याग केले आहेत असं ते म्हणाले.