देशभरात सध्या सुरु असलेल्या कठुआ आणि उन्नाव पाशवी बलात्कार प्रकरणावरुन वादळ उठले आहे. यामध्ये संशयीत आरोपी हे भाजपाशी संबंधीत नेते असल्याने भाजपावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यातच काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपावर जिव्हारी लागणारा वार केला आहे. बलात्कारी नेत्यांमुळे भाजपाचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी कठोर टीका केली आहे.

कमलनाथ म्हणाले, मी कुठेतरी वाचले होते की, भाजापचे असे २० नेते आहेत, ज्यांची नावे बलात्कारासंबंधी गुन्ह्यांशी जोडलेली आहेत. त्यामुळे आता या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी असावे की, बलात्कार जनता पार्टी असायला हवे याचा विचार जनतेनेच करावा. कमलनाथ यांचे हे वक्तव्य भाजापाला चांगलेच लागू शकते. त्यामुळे पुन्हा काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

देशात जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका ८ वर्षीय चिमुकल्या मुलीचे अपहरण करुन तिला एका मंदिरात आठ दिवस लपवून ठेवण्यात आले होते. दरम्यान, गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अनेक वेळा पाशवी अत्याचारही करण्यात आले. यामधील मुख्य आरोपी हा निवृत्त महसुल अधिकारी असून तो कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

तर उत्तर प्रदेशमधील उन्नाव या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर याचा जाब विचारणाऱ्या तिच्या वडिलांना आणि कुटुंबियांना मारहाण करण्यात आली यात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला, यामधील प्रमुख आरोपी हा भाजपाचा नेता आहे. अशा अंगावर काटा आणणाऱ्या क्रूर पाशवी घटनांमुळे सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.