बिहारमधील तीन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांत दोन जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया यायला लागल्या आहेत. बिहारमध्ये ही स्थिती असली तरी उत्तरप्रदेशातही दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आता चेहऱ्यांचे राजकारण थांबवावे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये काम करावे असा टोला बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांनी लगावला आहे.


गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुकीआधीच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदावारी घोषित केली होती. त्यानंतरही झालेल्या निवडणुकांमध्ये मोदींचा लोकप्रिय चेहरा आणि भाजपाचे चिन्ह कमळ याचाच निवडणूक प्रचारांमध्ये प्रतिक म्हणून वापर केला गेला. आगामी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातही उमेदवाराच्या नावाने मतं मागू नका तर मोदी आणि कमळाच्या नावानेच मत मागा असे थेट आदेशच भाजपा कार्यकर्त्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत.

याच अनुषंगाने बिहार आणि उत्तरप्रदेशात भाजपाच्या झालेल्या पराभवावर भाष्य करताना मांझी यांनी भाजपाला चेहऱ्यांचे राजकाण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी चेहऱ्यांवर विश्वास ठेऊन लोक मतं देतील असे गृहित न धरता त्यांच्यासाठी कामं करण्याचा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला आहे.

उत्तर प्रदेशातील ‘गोरखपूर’ आणि ‘फुलपूर’ या दोन मतदारसंघांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा तर फुलपूर हा केशव प्रसाद मौर्य यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. तसेच बिहारमधील जहानाबाद मतदारसंघातील लोकसभेची पोटनिवडणूक लालू प्रसाद यादव यांच्या राजदने जिंकली आहे. त्यामुळे येथे भाजपा आणि जदयू यांना मोठा झटका बसला आहे. तर अररिया विधानसभेची जागाही राजदने खिशात घातली आहे. तर भभूआच्या जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे.