पाकिस्तानमधील वाहिनीवरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अय्यर यांचे वक्तव्य देशद्रोही असल्याचे भाजपने म्हटले असून, त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेतल्याबद्दल माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर टीका केली त्याबद्दल केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि प्रकाश जावडेकर यांनी खुर्शीद यांच्यावर हल्ला चढविला आहे. अय्यर आणि खुर्शीद यांच्या देशद्रोही आणि देशविरोधी वक्तव्यबद्दल काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नायडू आणि जावडेकर यांनी केली आहे. अय्यर आणि खुर्शीद यांची वक्तव्ये आक्षेपार्ह आणि देशविरोधी आहेत. देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथून टाकण्याची भाषा परदेशात जाऊन करणे हा देशद्रोहच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.