पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या वातावरण पेटलं आहे. सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असून दिल्लीत शेतकरी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मंगळवारी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आणि सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांशी बैठकीत संवाद साधला. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींवर टीका करत असतानाच भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीवर घणाघाती टीका केली.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपामध्ये? सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “शेतकरी वर्ग दिल्लीला आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत ते आपल्या मागण्यांसाठी निदर्शनं करत आहेत. आणि पंतप्रधान मोदी मात्र तिकडे काशीमध्ये (वाराणसी) संगीताचा आनंद घेत मान डोलवत आहेत!”, असे ते म्हणाले. या टीकेवर उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी थेट राहुल गांधींवरच निशाणा साधला. “मोदीजी किमान काशीलाच (भारतात) गेले आहेत. मोदीजी बनारसला गेले तर विरोधकांना लगेच राग येतो. मोदीजी राहुल गांधींसारखे बँकॉकमध्ये तर गेलेले नाहीत. राहुल गांधी तिकडे बँकॉकमध्ये जाऊन बसले आहेत. तिथे नक्की ते कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?”, अशा शब्दात संबित पात्रा यांनी राहुल गांधीवर टीका केली.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

दरम्यान, शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की ही बैठक चांगली झाली आणि आम्ही निर्णय घेतला आहे की ३ डिसेंबरला पुन्हा चर्चा होईल. “आम्हाला एक छोटी समिती स्थापन करायची होती, पण चर्चा सर्वांसोबत व्हावी अशी शेतकरी नेत्यांची इच्छा होती”, असे ते म्हणाले.