शेतकऱयांना देण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेत दहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने कॅग अहवालाच्या साह्याने मंगळवारी केला. मंगळवारी संसदेमध्ये या विषयीचा कॅग अहवाल सादर करण्यात आल्यानंतर भाजपने केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. दरम्यान, योजनेत असंख्य अपात्र शेतकऱयांना कर्जमाफी देण्यात आल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला. त्यामुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचेही कॅगने म्हटले आहे.
यूपीए सरकार म्हणजे भ्रष्टाचाऱयांनी चालविलेले भ्रष्ट सरकार असल्याची टीका करून पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, एकूण ५२ हजार कोटी रुपयांच्या शेतकऱयांच्या कर्जमाफी योजनेत दहा हजार कोटींचा घोटाळा झालाय. सरकारने केलेला हा आणखी एक मोठा घोटाळा असून, त्यातील दोषींविरुद्घ कडक कारवाई झालीच पाहिजे. कॅगच्या अहवालातून योजनेतील भ्रष्टाचार उघड झालाय. या घोटाळ्यामुळे सुमारे ३४ लाख शेतकऱयांना सरकारची मदत मिळाली नाही. वास्तविक ते कर्जमाफीस पात्र होते. त्याचवेळी मदतीसाठी अपात्र ठरणाऱया २४ लाख शेतकऱयांना सरकारने भरघोस मदत केली.
कर्जमाफी योजनेमध्ये ६० हजार कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्यानंतरही शेतकरी अद्याप आत्महत्या करताहेत, याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. ज्या शेतकऱयाने कर्जाचा एखादा हप्ता फेडला आहे, त्याला या योजनेतून वगळण्यात आल्यामुळे एकप्रकारे प्रामाणिक शेतकऱयांवर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला.