आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी वादात अडकणारे पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शनिवारी पाकिस्तान व दक्षिण भारताबाबत त्यांनी केलेले वक्तव्य पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी समाचार घेतला आहे. सिद्धूंना आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतले पाहिजे, असे पात्रा यांनी म्हटले आहे. पात्रा यांनी सिद्धू यांच्यावरुन काँग्रेसला काही प्रश्नही विचारले आहेत.

सिद्धू यांच्यावर टीका करत पात्रा यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम वाढत चालले आहे. काँग्रेस देशाला उत्तर आणि दक्षिणच्या आधारावर विभाजित करण्याचा कट रचत आहे, असा गंभीर आरोप केला. ही काँग्रेसची रणनिती असल्याचेही त्यांनी म्हटले.

सिद्धू यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशमधील कसौली येथे सुरु असलेल्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये पाकिस्तान हा दक्षिण भारतापेक्षा चांगला असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, मी जेव्हा दक्षिण भारतात जातो. तेव्हा त्यांची भाषा समजत नाही व त्यांचे जेवणही चांगले नसते. तेथील संस्कृतीच वेगळी आहे. पण जेव्हा मी पाकिस्तानला जातो, तेव्हा तिथली भाषा आपल्यासारखी वाटते. तेथे सर्वकाही अद्भुत आहे.

दरम्यान, सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. त्यांच्या या कृतीवर भारतात अनेकांनी टीका केली होती. सिद्धू यांनी याप्रकरणी अनेकवेळा खुलासाही केला होता. तेव्हापासून सिद्धू हे चर्चेत आहेत.