भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर खोटे वृत्त (फेक न्यूज) शेअर करून अडचणीत सापडले आहेत. संबित पात्रा यांनी रविवारी ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’चा एक लेख ट्विट करत ‘एनडीटीव्ही’वर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण त्यांच्यावरच उलटलं आहे. आता ‘एनडीटीव्ही’ने संबित पात्रांच्या या ट्विटवर स्पष्टीकरण मागितले आहे. झालं असं की, ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’ने एक लेख प्रसिद्ध केला. या वृत्तामध्ये ‘एनडीटीव्ही’च्या हवाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ अयशस्वी ठरल्याचे म्हटले होते. संबित पात्रा यांनी लगेचच हा लेख ट्विट करत ‘एनडीटीव्ही’ला घेरण्याचा प्रयत्न केला. मुळात ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’ने जो लेख ‘एनडीटीव्ही’च्या हवाल्याने दिला होता. तो लेख ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केला होता. पण ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’ने चूक करत तिथे ‘एनडीटीव्ही’चा उल्लेख केला. संबित पात्रांनी त्याची खातरजमा न करता लगेचच ‘एनडीटीव्ही’ला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीच ‘एनडीटीव्ही’च्या अँकर निधी राजदान यांनी ‘लाइव्ह डिबेट’मधून संबित पात्रांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या कार्यक्रमानंतर संबित यांनी ‘एनडीटीव्ही’वर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.

1-1

संबित पात्रांनी रविवारी (दि.११) ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’चे ज्या लेखाची लिंक रिट्विट करताना ‘एनडीटीव्ही’वर निशाणा साधला होता. ‘एनडीटीव्ही’चे या वृत्ताशी काहीच देणेघेणे नव्हते. मुळात हा लेख माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी लिहिला होता. ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’ने ‘इंडियन एक्स्प्रेस’ऐवजी ‘एनडीटीव्ही’चा हवाला दिला. ‘एनडीटीव्ही’च्या आक्षेपानंतर पाकिस्तानी न्यूज पोर्टलने आपली चूक सुधारत ‘एनडीटीव्ही’चे नाव हटवले. परंतु, संबित पात्रांनी आपली चूक सुधारण्यापूर्वीच ‘एनडीटीव्ही’ने त्यांच्या ट्विटवर आक्षेप नोंदवत स्पष्टीकरण मागितले.

संबित पात्रांनी ज्या ‘टाइम्स ऑफ इस्लामाबाद’चा लेख रिट्विट केला. ती वेबसाइट भारताविरोधात खोट्या बातम्या चालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतात वंदे मातरम न म्हणणाऱ्या मुसलमानांना देश सोडण्यासाठी भाग पाडण्यात येत असल्याचे खोटे वृत्त या पाकिस्तानी न्यूज पोर्टलने यापूर्वी दिले होते.

2-3