उत्तर प्रदेशातील खलिलाबाद मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी एक अज्ञात चारचाकी वाहन आढळल्यानंतर भाजपने मोदींची सुरक्षा वाढविण्याची मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली. मोदींच्या सुरक्षेचा विचार करताना यूपीए सरकारने राजकारण बाजूला ठेवले पाहिजे, असे पक्षाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
मोदी यांच्या सुरक्षेची काळजी केंद्र सरकारने घेतलीच पाहिजे. महिन्याभरापूर्वीच मी मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सितारामन यांच्या शिष्टमंडळासह गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही, असे आश्वासन दिले होते. मोदींवर हल्ला होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या पुन्हा एकदा माध्यमांमधून येऊ लागल्या आहेत, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.