नवनव्या भिन्न वक्तव्यांवरून देशात फोफावणाऱ्या असहिष्णू वातावरणामुळे बळ मिळालेल्या विरोधकांना आज, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या संसदीय हिवाळी अधिवेशनात थोपविण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लेखक, कलावंत आणि अभिनेत्यांचा वाढता निषेध, दादरी हत्याकांड, विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या आदी घटकांनी विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरण्याची शक्यता असून असहिष्णुतेचा निषेध करणारा ठराव करण्याचा आग्रह केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व मुद्दय़ांवर चर्चा करण्यास सरकार तयार असले, तरी आक्रमकपणे त्या मुद्दय़ांना थोपवून लावण्याची तयारी बुधवारी भाजपच्या संसदीय समिती बैठकीत करण्यात आली.
सरकार असहिष्णुतेसह सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे पण खरेतर हे प्रश्न राज्यांच्या अखत्यारीतील आहेत. भाजपने अशा घटनांना पाठिंबा दिलेला नाही. दादरीतील घटना व कलबुर्गी यांची हत्या या घटना दुर्दैवी होत्या व सरकार अशा घटनांचा निषेध करते. पंतप्रधान मोदी यांनीही या घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान, भाजप किंवा रालोआ सरकार यांना जबाबदार धरणे म्हणजे विरोधकांचीच असहिष्णुता असल्याचा पवित्रा संसदेत भाजप घेईल, या मुद्दय़ांवर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारविरोधात आंदोलने आणि निषेधाच्या ज्या फैरी झडल्या आहेत, त्या काँग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोपही भाजप करणार आहे. मात्र, भाजपच्या या पवित्र्यामुळे गेल्या दोन अधिवेशनांप्रमाणेच हेही अधिवेशन निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. भाजपच्या खेळीमुळे वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) संमत करण्यासाठी विरोधकांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याचे संकेत आहेत.

भाजपची रणनीती!
राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वावर सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पोतडीतून काढलेल्या तोफगोळ्यांचा वापर भाजप हिवाळी अधिवेशनामध्ये वापर करणार असून, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद यांनी भाजपविरोधात केलेल्या वक्तव्यांनाही सरकार उकरून काढणार आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही काही बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे अधिवेशनामध्ये विरोधक त्यांना अस्त्र म्हणून वापरू शकेल. यासाठीच भाजपनेअधिवेशनात आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.