कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगला असून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. दोन्ही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी कार्यकर्ते मात्र पक्षभेद करताना दिसत नाहीयेत. एकीकडे नरेंद्र मोदी कर्नाटकमध्ये काँग्रेसने काय काम केलं अशी विचारणा करत असताना प्रचारसभेसाठी जमा झालेले कार्यकर्ते मात्र भूक मिटवण्यासाठी काँग्रेसच्याच इंदिरा कॅन्टीनचा आधार घेताना दिसतायत. कार्यकर्त्यांचे काही फोटो व्हायरल झाले असून, भाजपाला ट्रोल केलं जात आहे. सिद्दरमय्या सरकारमधील मंत्री कृष्णा गौडा यांनी हे फोटो ट्विट केले आहेत.

कृष्णा गौडा फोटो ट्विट करताना लिहिलं आहे की, ‘आमच्या कॅन्टीनचा फायदा भाजपा समर्थकांना होत असल्याचा आनंद आहे. कॅन्टीन सर्वसामान्यांना परवडणारं आहे हेच यातून सिद्ध होतंय. काँग्रेस सरकारचे आभार’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे रोजी कर्नाटकात तिसऱ्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना राज्य सरकारने राजधानी बंगळुरुला गुन्हेगारीची राजधानी बनवली असल्याचं म्हटलं होतं. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवत, नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण संपल्यानंतर इतका वेळ उन्हात बसलेले आणि घोषणाबाजी करुन दमलेल्या कार्यकर्त्यांना प्रचंड भूक लागली होती. भूक मिटवण्यासाटी कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरु केली. खिशात जास्त पैसे नसल्याने कमी पैशात जेवण कुठे मिळेल याचा कार्यकर्ते शोध घेत होते. अखेर इंदिरा कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी आपली भूक मिटवली.

काँग्रेसच्या सिद्दरमय्या सरकारने सुरु केलेल्या या कॅन्टीनमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी रांग लावून टोकन घेतले आणि पोट भरुन खाल्ल. या कॅन्टीनमध्ये पाच ते दहा रुपयांच पोटभर जेवण दिलं जातं. १६ ऑगस्ट २०१७ ला इंदिरा कॅन्टीनची सुरुवात करण्यात आली. जवळपास दोन लाख लोकांना याचा फायदा होतो. यामध्ये खासकरुन मजूर, वाहनचालक, सुरक्षारक्षक आणि गरिबांचा समावेश असतो.