भाजपा हा असा पक्ष आहे जो राम मंदिराची घोषणा करतो पण मंदिर मात्र नथुराम गोडसेचे बांधतो असे म्हणत काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. गुरुवारी मध्यप्रदेशातील उमरिया या ठिकाणी झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. निवडणुका जवळ आल्या की भाजपाला राम मंदिराची आठवण येते.

‘मंदिर वहीं बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे’ हे यांचे तत्त्व आहे. राम मंदिर बांधू असे सांगतात आणि मंदिर बांधतात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामाचे. हिंदू महासभेने ग्वाल्हेरच्या दौलतगंज भागात नथुराम गोडसेचे मंदिर बांधले आहे. भाजपा खासदार साक्षी महाराज सांगतात की नथुराम गोडसे आमचा आदर्श आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? असाही प्रश्न ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपस्थित केला.

भाजपाचे नेते असोत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत ते कायम विकास विकास असे भजन करताना दिसतात. मात्र एक लक्षात घ्या देशात जो काही विकास झाला आहे तो काँग्रेसमुळेच झाला आहे. भाजपाच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात काय झाले हे तुम्ही पाहाताच आहात असेही म्हणत सिंधिया यांनी टोला लगावला.

मध्यप्रदेशात निवडणुका जवळ आल्याने भाजपाला लोकांची आठवण झाली आहे. त्यांना तुमच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नाही. ते फक्त विकासाच्या गोष्टी करतात. प्रत्यक्षात त्यांना कोणतेही काम करायचे नाही तर फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे असेही सिंधिया यांनी म्हटले आहे. याआधी बुधवारी झालेल्या भाषणात सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन आणू असे सांगतात. तुमच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर बुलेटसारखे  गगनाला भिडले आहेत. तुम्हाला तुमच्या विदेश दौऱ्यातून त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर त्यांनी निशाणा साधला.