भाजपच्या प्रवक्त्यांचा सवाल; दौऱ्याचा वाद सुरू

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यावरून भाजपने गुरुवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. राहुल गांधी ज्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी गेले असल्याचा दावा करण्यात आला, ती परिषद जुलै महिन्यातच आयोजित करण्यात आली होती, असे भाजपने म्हटले आहे. जी वस्तुस्थिती आम्हाला माहिती नाही ती दडविण्यासाठी काँग्रेसने खोटेपणाचा मार्ग अवलंबिला आहे, असे भाजपने म्हटले आहे.
‘वीकएण्ड विथ चार्ली रोझ’ या परिषदेसाठी राहुल गांधी गेल्याचा दावा केला जातो. ती परिषद २५ जून ते ४ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव म्हणाले. ज्या संस्थेच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी गेले असल्याचा दावा केला जातो, त्या परिषदेच्या व्यवस्थापकाने सांगितले की, काँग्रेसच्या वतीने कोणताही नेता परिषदेला हजर नव्हता किंवा भविष्यात हजर राहण्याबाबतची माहितीही नाही. वैयक्तिक स्वरूपात दौऱ्यावर जाण्याचा राहुल गांधी यांना अधिकार आहे, मात्र काँग्रेसने खोटारडेपणा करून देशाची दिशाभूल करू नये, असेही राव म्हणाले.