पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी आपलं नेतृत्व पुन्हा सिद्ध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, या निवडणुकीदरम्यान कूचबेहेर आणि इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे मतदान प्रक्रियेला बोट लागलं. त्यानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्याचं समोर आलं. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी देखील याच मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे. नुकत्याच ममता बॅनर्जी दिल्लीला येऊन गेल्या. त्यांच्या या दौऱ्यावरून भाजपानं प्रसारमाध्यमांना आणि त्यांच्याआडून थेट ममता दीदींवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधानांची भेट

गेल्याच आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येऊन भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्या भेटल्या. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या विरोधात विरोधकांची मोटच बांधण्याचा जणू इशारा दिला. त्यांच्या या भेटीनंतर भाजपाकडून परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी ममता बॅनर्जींवर आणि प्रसारमाध्यमांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पंतप्रधान नरेंद्री मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या…!

“कुणीही त्यांना हिंसाचार आणि हत्यांविषयी विचारलं नाही”

बी. एल. संतोष यांनी ट्वीट करून प्रसारमाध्यमे आणि त्यांच्या आडून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. “एक मुख्यमंत्री दिल्लीला येतात. इथे काही राजकीय गाठीभेटी केल्यानंतर त्या त्यांच्या राज्यात निघून जातात. दिलेल्या सहकार्यासाठी माध्यमांचे आभार देखील मानतात. पण एकाही स्वयंघोषित अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते असणाऱ्याने त्यांना त्यांच्या राज्यात होत असलेला राजकीय हिंसाचार आणि क्रूर हत्यांविषयी प्रश्न विचारला नाही” असं ट्वीट संतोष यांनी केलं आहे.

 

भाजपाचे महासचिव असलेले बी. एल. संतोष हे केंद्रीय राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रीय असलेले दिसत नसले, तरी कर्नाटकच्या राजकारणात त्यांचा चांगलाच वावर आहे. कर्नाटकमध्ये नुकतेच बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावर पायउतार झाले असून बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली आहे. या पदासाठी इतर नावांसोबतच बी. एल. संतोष यांचं नाव देखील आघाडीवर होतं. प्रसिद्धीच्या वलयापासून दूर असलेले बी. एल. संतोष हे आरएसएसचे प्रचारक असून त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत.