देशापुढील सध्याच्या गंभीर आर्थिक समस्येला यूपीए सरकारच कारणीभूत असून, सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे देशात मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका घेण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली. 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने मुखर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. आर्थिक समस्या हाताळण्याची क्षमता यूपीए सरकारकडे नसल्यामुळेच देशापुढे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी संसदेमध्ये केलेल्या निवेदनाबद्दल आम्ही अतिशय नाराज आहोत, असे अडवाणी यांनी मुखर्जी यांना सांगितले आणि मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका घेण्याची मागणी केली.
दरम्यान, लोकसभेमध्ये आपल्या निवेदनानंतर डॉ. सिंग विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या भाषण न ऐकताच तिथून निघून गेल्याबद्दलही पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. देशापुढील आर्थिक समस्येबद्दल पंतप्रधानांनी सादर केलेले निवेदन अतिशय निराशाजनक असल्याची टीका पक्षाचे खासदार यशवंत सिन्हा यांनी केली.