राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्याचे भाजपने ठरविले आहे. लोकसभेचे नेते असलेल्या शिंदे यांच्या भाषणांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाने शुक्रवारी घेतला. त्याचबरोबर शिंदे यांच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखवण्याचेही पक्षनेतृत्त्वाने निश्चित केले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार म्हणाले, शिंदे देशभरात कुठेही सार्वजनिक कार्यक्रमासाठी गेल्यावर तिथे पक्षाचे कार्यकर्ते त्यांना काळे झेंडे दाखवतील. त्याचबरोबर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि पक्षाच्या संसदीय मंडळाचे प्रमुख लालकृष्ण अडवानी हे शिंदे यांच्यासोबत होणाऱया बैठकांमध्ये सहभागी होणार नाहीत. शिंदे यांनी तातडीने आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी.
संसदेचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे यांच्याविरोधात आम्ही सातत्याने घोषणा देणार नाही. मात्र, ते बोलायला उभे राहिल्यावर त्यांना नक्कीच विरोध करू, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाच्या हिंदूंविरोधी मानसिकतेमुळेच शिंदे यांनी वरील वक्तव्य केल्याचा आरोपी त्यांनी केला.