गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने दिलेल्या चहावाला ‘उपाधी’चा उपयोग प्रचारासाठी करण्याची अभिनव योजना भारतीय जनता पक्षाने आखली आहे. ‘चाय पे चर्चा’ असा प्रचाराचा कार्यक्रमच भाजपने हाती घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी यासंबंधीची घोषणा आज केली.
येत्या १२ फेब्रुवारीपासून देशभरात ‘चाय पे चर्चा’ प्रचार अभियान छेडण्यात येईल. ज्यात एकाच वेळी तीनशे शहरांमध्ये छोटेखानी सभा आयोजित केली जाईल. नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये यात सहभागी होतील. स्वच्छ प्रशासनावर मोदी नागरिकांशी चर्चा करतील. चार जण एकत्र येऊन चहा पीत राजकारणावर खुलेपणाने चर्चा करतात. हीच ‘चाय पे चर्चा’ मागची संकल्पना असल्याचे स्वराज यांनी सांगितले. या माध्यमातून सुमारे दोन कोटी मतदारांपर्यंत पोहोचता येईल, असा दावा स्वराज यांनी केला. एका वेळी तीनशे शहरांमधील एक हजार ठिकाणी हा कार्यक्रम होईल. दहा टप्प्यांत याच पद्धतीने चर्चा होईल.