आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड जाहीर होताच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एकांतात आकांत सुरू केला असताना एकीकडे त्यांची मनधरणी करत दुसरीकडे पक्षात सारे काही आलबेलच आहे, असे भासविण्याच्या धडपडीत भाजपचे नेते गुंतले आहेत. इतकेच नव्हे तर अडवाणी आणि मोदी हे भोपाळमध्ये २५ सप्टेंबरला एकाच व्यासपीठावर येतील, अशी घोषणाही राजनाथ सिंह यांनी शनिवारी केली.
शनिवारीही भाजपच्या बडय़ा नेत्यांनी अडवाणी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. सुषमा स्वराज, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद आणि बलबीर पुंज यांनी त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यांच्या घराबाहेर पडताच मात्र या नेत्यांनी सारे काही आलबेल असल्याचाच दावा केला. पक्षात कोणतीही नाराजी नाही, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. पक्षात मतभेद आहेत या निव्वळ वावडय़ा आहेत, असे प्रसाद म्हणाले. मोदी यांनीही शुक्रवारी अडवाणींची अर्धा तास भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी काही न बोलता ते तडक अहमदाबादला गेले. तेथे स्वागताला लोटलेल्या गर्दीसमोर ते म्हणाले की, अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे आधारवड असून तो आधार कार्यकर्त्यांनी टिकवला पाहिजे.
अडवाणी यांनी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. त्याबाबत मुंबईत सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आमच्यापैकी कोणालाही चार शब्द सुनावण्याचा पूर्ण अधिकार आहे. अर्थात, मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असे अडवाणी यांनी मला एकदाही सांगितलेले नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
व्हिसा धोरणात बदल नाही
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांची निवड केली असली तरी धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करण्याच्या कारणावरून त्यांना व्हिसा नाकारण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र प्रवक्त्या मारी हार्फ यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे मोदी हे या निर्णयाच्या फेरविचारासाठी अर्ज मात्र करू शकतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
अधिक वृत्त/पान ६

*अडवाणी आधारवड – मोदी
*मतभेद या वावडय़ाच – प्रसाद
*नाराजी नाहीच – स्वराज
*दोघे एकत्र येतीलच -राजनाथ