कूरबिहारमधील शीतलकुची येथे शनिवारी झालेल्या हिंसाचारावरून भाजप आणि तृणमूल कांग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय दलांना घेराव घालण्याबाबत केलेल्या सूचनेमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. मात्र, भाजपने मतदारांना भयभीत करण्यासाठी हे कारस्थान रचले, असा आरोप तृणमूल कांग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केला.

सीआयएसएफच्या गोळीबारात ठार झालेल्यांना ममता यांनी श्रद्धांजली वाहिली; मात्र आनंद बर्मन नावाच्या भाजप कार्यकत्र्याच्या मृत्यूबाबत त्यांनी शोक व्यक्त केला नाही. ममता या मृत्यूंबाबतही तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप शहा यांनी शांतिपूर येथे रोड शोनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

तरच राजीनामा देईन

शीतलकुची येथील हत्यांची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा द्यावा, अशी मागणी बॅनर्जी यांनी केली आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या जनतेने मागणी केली, तरच मी पदाचा राजीनामा देईन, असे शहा यांनी सांगितले. तथापि, ममता बॅनर्जी यांना २ मे रोजी पदाचा त्याग करावा लागेल, असे भाकीतही शहा यांनी वर्तवले.

दरम्यान,  निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये वाईट मुलेसुधारली नाहीत, तर कूचबिहारधील शीतलकुचीमध्ये घडली तशा आणखी घटना घटतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी रविवारी सांगितले.

केंद्रीय दलांना घेराव घालण्याच्या सूचना ममता बॅनर्जी यांनी जनतेला दिल्या होत्या. केंद्रीय दलांवर हल्ला करण्याची चिथावणी ममता यांनीच दिली. त्यामुळे गोळीबार झाला आणि चौघांना प्राण गमवावा लागला. मग, शीतलकुचीतीर्ल हिंसाचारासाठी ममता जबाबदार नाही का?    अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी भाजपने हे कारस्थान रचले. ही लोकशाहीची हत्या आहे. भाजपच्या इशाऱ्यावरून आता निवडणूक आयोगाने मला शीतलकुचीमध्ये जाण्यापासून रोखले आहे. मात्र, जनता प्रत्येक गोळीला मतांद्वारे उत्तर देईल.   ममता बॅनर्जी, तृणमूल कांग्रेस