कोलकाता :पश्चिम बंगालच्या पूर्व आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्य़ांच्या अनेक भागांत रविवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्या आणि यात काही जण जखमी झाले, अशी माहिती दोन्ही पक्षांतील सूत्रांनी दिली.

तृणमूलने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी केला. ‘आमच्या पक्ष कार्यकर्त्यांवरील प्रत्येक हल्ल्यानंतर आणखी लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येतील’, असे गेल्या महिन्यात ममता बॅनर्जीची साथ सोडून भाजपमध्ये आलेले अधिकारी यांनी पुरुलियातील  रोड शो दरम्यान पत्रकारांना सांगितले.

पूर्व मिदनापूरच्या कांठी भागातील भाजाचौली येथेही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यात आपले काही कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला, तर भाजपमधील अंतर्गत भांडणातून हा संघर्ष उद्भवल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला. याच जिल्ह्य़ाच्या मारिशदा येथेही हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम मिदनापूरमधील केशपूर येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर विटा आणि लाठय़ांनी हल्ला केला.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिथावणी दिल्यानंतरही आपला पक्ष संयम दाखवत असल्याचे सांगून तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अजित मैती यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला.