नोटबंदीचा गैरवापर झाल्याचा काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी

नवी दिल्ली : काळा पैसा पांढरा करण्यासाठी भाजपने नोटबंदीचा खुबीने वापर केला. १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या पाच दिवसांच्या कालावधीत रिझव्‍‌र्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याची परवानगी दिली होती. त्याचा गैरफायदा घेत गुजरातमधील ११ जिल्हा सहकारी बँकांमध्ये ३११८ कोटी रुपये जमा करण्यात आले. यापैकी सर्वाधिक रक्कम भाजपचे अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत (७४५.५८ कोटी) जमा झाले आहेत. असा आरोप करतानाच भाजप नेत्यांच्या या गैरप्रकाराची चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

पक्षप्रवक्ते सुरजेवाला यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा यांना लक्ष्य बनवले. त्यांच्या ‘आशीर्वादा’नेच काळ्याचे पांढरे करण्याचा उद्योग भाजपने केला आहे. शहांच्या विरोधात बोलण्याचे भाजपमध्ये कोणाचे धाडस नाही. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश द्यावा, असे सुरजेवाला म्हणाले. मुंबईतील ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते मनोरंजन एस रॉय यांनी १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या पाच दिवसांत देशातील जिल्हा सहकारी बँकेमध्ये किती रक्कम जमा झाली याची आकडेवारी नाबार्डला ‘माहितीच्या अधिकारा’त विचारली होती.

मालमत्ता खरेदीतील पैसा?

नोटाबंदी लागू होणार होती याची कल्पना भाजपमध्ये होती. त्यामुळेच मोदींनी या निर्णयाची घोषणा करण्याआधी भाजपने देशभर विविध राज्यांमध्ये मोठय़ा मालमत्ता खरेदी केल्या. त्यासाठी पैसा आला कुठून? नोटबंदी लागू होण्याआधी काहीच दिवस बिहारमध्ये ८ आणि ओडिशामध्ये १८ मालमत्तांची खरेदी भाजपने केली. परिषदेत सुरजेवाला यांनी सात मालमत्तांची यादी सादर केली. या मालमत्ता भाजपने खरेदी केल्या असून त्याचा हिशोब द्यावा, असे आव्हान सुरजेवाला यांनी दिले.

बँका शहांच्या मर्जीतील

गुजरातमधील ११ जिल्हा सहकारी बँकेत जमा झालेले ३११८.५१ कोटी रुपये अमित शहा आणि त्यांच्या मर्जीतील नेत्यांची सत्ता असलेल्या बँकांमध्ये झालेले आहेत. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अमित शहा अध्यक्ष होते. आता ते संचालक आहेत. या बँकेत ७४५.५८ कोटी जमा झाले. राजकोट बँकेत ६९३.१९ कोटी जमा करण्यात आले. सूरज बँक- ३६९.८५ कोटी, सबरकांत बँक- ३२८.५० कोटी, बनासकांत बँक-२९५.३० कोटी, मेहसाना बँक-२१५.४४ कोटी, अमरेली बँक- २०५.३१ कोटी, भरुच बँक- ९८.८६ कोटी, जुनागढ बँक-५९.९८ कोटी आणि पंचमहाल बँक- ३०.१२ कोटी जमा झाले.