लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर भाजप विरुद्ध काँग्रेस असा मुख्य सामना असताना महाराष्ट्रात हे दोन मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष १७ मतदारसंघांमध्ये आमने-सामने आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ११ मतदारसंघांमध्ये  लढत आहेत.

केंद्रातील सत्तेसाठी भाजपने कंबर कसली असताना भाजपला पराभूत करण्याकरिता काँग्रेस पक्ष तयारीनिशी रिंगणात उतरला आहे. सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये  वाक्युद्ध सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी यांना लक्ष्य केले असताना, मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रात प्रचाराला अजून तेवढा रंग चढलेला नाही. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वध्र्यात  सभा आहे. गेल्या आठवडय़ात कोल्हापूरमध्ये झालेल्या युतीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

गेल्या साडेचार वर्षांत भाजप आणि काँग्रेसचा सामना झाला अशा प्रत्येक निवडणुकांमध्ये आधी काँग्रेसचा पराभव झाला होता. पण गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने तिन्ही राज्यांत भाजपचा पराभव केला होता.

राज्यातही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीला मागे टाकले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपच पहिल्या क्रमांकावर राहील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आघाडीला यश मिळेल-चव्हाण

तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातील नाराजीचा लाभ काँग्रेसला होईल. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

काँग्रेस मित्र पक्षांच्या युतीबरोबर लढती होणारे मतदारसंघ

  • अमरावती- शिवसेना विरुद्ध युवा स्वाभिमान
  • हातकणंगले- शिवसेना विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना
  • सांगली- भाजप विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना
  • पालघर- बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना