News Flash

विरोधी पक्षनेते दोघांसाठी प्रचारात

नगरमध्ये भाजप तर अन्यत्र काँग्रेस

(संग्रहित छायाचित्र)

नगरमध्ये भाजप तर अन्यत्र काँग्रेस

अहमदनगर मतदारसंघात पुत्र भाजपच्या वतीने निवडणूक लढवीत असल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या मतदारसंघात आघाडीचा प्रचार करणार नाही, असे जाहीर केले. त्याच वेळी राज्यात अन्यत्र काँग्रेस आघाडीचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केल्याने विरोधी पक्षनेते एकाच वेळी पुत्रासाठी भाजपचा तर अन्यत्र काँग्रेसचा प्रचार करणार आहेत.

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने विखे-पाटील यांच्या पुत्रासाठी न सोडल्याने नाराज झालेल्या सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे हे आता नगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. या पाश्र्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला विखे-पाटील शनिवारी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणूगोपाळ, मधुसूदन मेस्त्री या केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेते उपस्थित होते. कोणीही एका शब्दाने विखे-पाटील यांच्याकडे विचारणा केली नाही. काँग्रेसची एक प्रकारे गांधीगिरीच होती, अशी मार्मिक प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली.

बैठकीनंतर विखे-पाटील यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. नगरमध्ये आघाडीचा प्रचार करणार नाही. अन्यत्र काँग्रेसचा प्रचार करणार, असे त्यांनी सांगितले. मुलासाठी भाजप तर अन्यत्र काँग्रेस. म्हणजेच विरोधी पक्षनेते भाजप आणि काँग्रेस या दोघांचा प्रचार करणार आहेत. नगरमध्ये विखे-पाटील हे भाजपचा अधिकृतपणे प्रचार करीत नाहीत. फक्त भेटीगाठी घेत आहेत.

विरोधी पक्षनेते उघडपणे भाजपचा उमेदवार असलेल्या मुलाला मदत करीत असताना त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत काँग्रेस पक्ष दाखवू शकत नाही. कारण पक्षाकडील विरोधी पक्षनेतेपद जाण्याची भीती आहे. यामुळे विखे-पाटील यांचेही फावले आहे.

सुवेंद्र गांधी यांचा बुधवारी अर्ज?

नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज, शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर एकूण ५७ जणांनी ८९ उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले. भाजपने उमेदवारी डावललेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनीही आज उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयातून नेला. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 1:33 am

Web Title: bjp vs congress in lok sabha election 2019 2
Next Stories
1 १७ मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस
2 घुसखोरीविरोधात चौकीदारच संरक्षण करणार – मोदी
3 विदर्भात युतीला निर्भेळ यश कठीण
Just Now!
X