तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर येथील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अस्थिर होताना दिसत आहे. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी रात्री शशिकला यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. दरम्यान, पनीरसेल्वम यांच्या बंडामागे भाजपचे पाठबळ असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, तुर्तास भाजप यामध्ये थेट हस्तक्षेप न करता वेट अँण्ड वॉचचा पवित्रा घेईल, असा अंदाज आहे. जयललिता यांच्या मृत्यूनंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पनीरसेल्वम यांच्या सरकारच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच पनीरसेल्वम यांनी व्ही. शशिकला यांच्याविरोधात बंड करण्याची हिंमत दाखविल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णाद्रमुकमध्ये फूट पाडून येथील सत्तेची सूत्रे स्वत:च्या हातात घेण्याचा भाजपचा डाव होता. याची कुणकुण लागल्यामुळेच शशिकला यांनी इतक्या तातडीने पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केली. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर पनीरसेल्वम ठोस निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ घेत आहेत.  तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सोमवारी असलेली राज्यातील अनुपस्थिती याच डावपेचांचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. अण्णाद्रमुकमधील शशीकलाविरोधी घटकांना एकत्र येण्यास पुरेसा वेळ मिळावा, जेणेकरून त्यांना शशीकला यांच्याविरोधात कायदेशीर बंड करता येईल, अशी रणनीती यामागे आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात शशीकला यांचे पती एम. नटराजन हे दिल्लीत तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपमध्ये तामिळनाडूतील सत्ताकारणाविषयी गंभीर विचारमंथन सुरू झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने शशीकला यांच्यासंदर्भातील खटल्याचा निकाल दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारावीत, अशा भाजपचा सध्याचा पवित्रा आहे. याशिवाय, संसदेतही अण्णाद्रमुकच्या खासदारांची संख्या लक्षणीय आहे. अण्णाद्रमुकचे लोकसभेत ३७ आणि राज्यसभेत  १३ खासदार आहेत. संसदेत महत्त्वपूर्ण विधेयकांच्या मंजूरीसाठी हे पाठबळ निर्णयाक ठरू शकते. मोदी आणि शहा यांचा पनीरसेल्वम यांना मूक पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांनी पक्षाच्या खजिनदारपदावरून हटवले आहे. पनीरसेल्वम यांनी शशिकला यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवल्यानंतर त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. पनीरसेल्वम यांच्या जागी दिंडीगुल सी श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या बरखास्तीविरोधातही पनीरसेल्वम यांनी बंड केले आहे. खजिनदारपदी अम्मांनी (जयललिता) मला नेमले होते. माझ्याकडून कोणीही हे पद हिसकावून घेऊ शकत नाही. मी कोणाला घाबरत नाही व द्रमुकशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी जयललिता यांच्या समाधिस्थळी धाव घेतली होती. त्यांनी तेथे सुमारे ४० मिनिटे मौन धारण केले होते. त्यानंतर त्यांनी शशिकला यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील अडसर दूर व्हावा म्हणून रविवारी आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा खुलासा करून खळबळ उडवून दिली होती.