अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या सोबतीने उपाध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस निवडणूक लढवत असल्याने भाजपाचा पाठिंबा कोणाला अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र याचसंदर्भात भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाच्या परदेश विषयक विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘ओव्हरसीज फ्रेण्ड्स ऑफ बीजेपी’च्या अमेरिकन विभागाला यासंदर्भात एक पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आणि भाजपा यासंदर्भात महत्वाचे स्पष्टीकरण दिलं आहे.

अमेरिकेमध्ये ३ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांना उमेदवारी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकेतील भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरचे ट्रम्प यांचे व्हिडिओ प्रचारात वापरले जात आहेत. मात्र भाजपाने आपल्या अमेरिकतील सदस्यांना निवडणुकीमध्ये उमेदवार असणाऱ्या कोणत्याही पक्षाचा प्रचार करताना पक्षाचे नाव वापरु नये असं सांगितलं आहे. रिपब्लिकन पक्ष असो किंवा डेमोक्रॅटिक पक्ष निवडणुकीचा प्रचार करताना तो आपल्या खासगी मर्यादेमध्ये आणि पक्षाच्या नावाचा आणि हुद्द्याच्या अधिकृत वापर न करता करावा असं भाजपाने अमेरिकन सदस्यांना सांगितलं आहे.

नक्की वाचा >> कमला हॅरिस आणि १०८ नारळ… मावशीनेच सांगितला कमला यांच्या ‘विजयाचा फॉर्म्युला’

भाजपाच्या परदेश विषयक विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘ओव्हरसीज फ्रेण्ड्स ऑफ बीजेपी’च्या अमेरिकन विभागाला यासंदर्भात एक पत्र पाठवलं आहे. अमेरिकेतील निवडणूक प्रचारासाठी पक्षाचे नाव वापरु नये असं चौथाईवाले यांनी पत्रात म्हटलं आहे. “आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणे हा त्या देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार असतो. ओव्हरसीज फ्रेण्ड्स ऑफ बीजेपीच्या प्रत्येक सदस्याने या प्रक्रियेमध्ये आपले योगदान नक्की द्यावे. मात्र हे योगदान देताना सदस्यांना आपल्या खासगी मर्यादेमध्ये राहून काम करावे. अमेरिकन निवडणुकांमध्ये भाजपाची कोणतीही भूमिका नाहीय,” असं चौथाईवाले यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

कमला देवी हॅरिस यांच्यासंदर्भातील प्रश्नावर चौथाईवाले म्हणतात…

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना अमेरिकेतील भारतीय वंशाच्या सिनेटर कमला देवी हॅरिस यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चौथाईवाले यांनी कमला या निवडणूक लढवत असल्याने सर्व भारतीयांना आनंद झाला आहे असं म्हटलं. भारताशी संबंधित एखादी व्यक्ती अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र भाजपा या निवडणुकीमध्ये कोणाचेच समर्थन करत नाहीय. अमेरिकेत राहणारे आमचे सदस्य त्यांच्या इच्छेनुसार निवड करतील. कारण हा संपूर्ण मुद्दा तेथे राहणाऱ्या लोकांच्या स्वायत्तेसंदर्भातील आहे, असंही चौथाईवाले यांनी सांगितलं.  “निवडणूक ही कोणत्याही देशातील अंतर्गत गोष्ट असते. त्यामुळेच यामध्ये भाजपाची कोणताही भूमिका नाहीय. भारत आणि अमेरिकेमध्ये चांगले संबंध आहेत. या संबंधांचे अमेरिका आणि भारतामध्ये सर्वच जण स्वागत करतात,” असंही चौथाईवाले यांनी म्हटलं आहे.

मात्र रिपब्लिकनकडून मोदींच्या व्हिडिओचा वापर

एकीकडे भाजपाने या निवडणुकीमध्ये आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या प्रचारासाठी रिपब्लिकन पक्षाकडून भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आल्यात त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. प्रचाराच्या या व्हिडिओमध्ये दोन ठिकाणी मोदींचा चेहरा दिसत आहे. एका व्हिडिओ मागील वर्षी ह्यूस्टनमध्ये झालेल्या ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमातील आहे तर दुसरा व्हिडिओ हा फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये घेतलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमातील आहे. मागील आठवड्यामध्ये ट्रम्प यांना या प्रचाराच्या व्हिडिओसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “आम्हाला भारताचा पाठिंबा आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा पाठिंबा मिळाला आहे. मला असा विश्वास आहे की अमेरिकेतील भारतीय नक्कीच मला मतदान करतील,” असं म्हटलं होतं.