मणिपूरमधील मानवी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांचे आमच्या पक्षात स्वागत आहे, असे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मंगळवारी सांगण्यात आले. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही हे केंद्रीय नेत्तृत्व ठरवेल, असे भाजपचे स्थानिक नेते जॉयकिसन यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रत्येकाचे स्वागत आहे. जर शर्मिला इरोम यांना आमच्या पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. आम्ही त्यांना प्रवेश नाकारणार नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. याचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेते घेतील, असे  जॉयकिसन यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ साली आम आदमी पक्षाने इरोम शर्मिला यांना मणिपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. मात्र, इरोम शर्मिला यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.
मणिपूरच्या आयर्न लेडी म्हणून परिचित असलेल्या इरोम चानू शर्मिला आज त्यांचे उपोषण १६ वर्षांनंतर सोडणार आहेत. लष्करी दले विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती व त्यासाठी त्यांनी उपोषण केले होते. त्यांना इ. स. २००० पासून नाकावाटे नळीने अन्न देण्यात येत होते. रुग्णालयाचेच तुरुंगात रूपांतर करून देण्यात आले होते. स्थानिक न्यायालयात शर्मिला इरोम उपोषण सोडणार आहेत. उपोषण सोडण्याची घोषणा त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच केली होती. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी उपोषण सोडत असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. तसेच अफ्स्पाचा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही शर्मिला इरोम यांनी सांगितले. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.