राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता एस. राजेशच्या हत्येनंतर केरळमध्ये भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सीपीएमकडून जाणीवपूर्वक भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असल्याचा आरोप भाजपकडून होतो आहे. तसंच याच घटनांमुळे भाजप कार्यकर्ते संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनं भव्य रोड शो करण्याची तयारी सुरू केली आहे. कन्नूर ते तिरूअनंतपुरम या ५०० किलोमीटरच्या पट्ट्यात हा भव्य रोड शो करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.

या रोड शोची सुरूवात आणि शेवट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा करणार आहेत. भाजप आणि सीपीएम यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे, केरळमध्ये डाव्यांची सत्ता आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले वाढले आहेत असा आरोप भाजपनं केला आहे.

केरळमध्ये वाढलेल्या या हिंसाचाराविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता भाजपतर्फे करण्यात येते आहे त्यासाठी डाव्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. भाजपनं सुरू केलेल्या भव्य रोड शोची तयारी हा देखील दबावतंत्राचाच एक भाग आहे असंही मानलं जातंय.

ओणमचा सण झाल्यानंतर भव्य रोड शोची सुरूवात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करण्यात येईल अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. हा रोड शो आठवडाभर चालणार आहे, तसंच देशातल्या भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या रोड शोमध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे असंही भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

कन्नूरपासून हा रोड शो सुरू होणार आहे आणि तिरूअनंतपुरममध्ये सात दिवसांनी या रोड शोची सांगता होणार आहे. केरळमध्ये भाजपचा जनाधार वाढतो आहे, अशी सीपीएम नेत्यांची धारणा आहे ज्यामुळे भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत आणि त्यांची हत्या केली जाते आहे असा आरोप भाजपनं केला आहे. मागील वर्षी भाजप आणि संघाच्या एकूण १२ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.

जे हल्लेखोर आणि खुनी आहेत त्यांना राज्य सरकारनं अभय दिलं आहे असाही आरोप भाजपनं केला आहे. हल्लेखोर आणि खुन्यांवर कारवाई करण्यात यावी याचसाठी आम्ही  रोड शोचं आयोजन भाजपनं केलं आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.