News Flash

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल

पहिल्यांदाच आमदार होऊनही संधी; ज्येष्ठांना डावलून भाजपचे धक्कातंत्र

राजकीय अंदाज-आडाख्यांना चकवा देत आणि चर्चेत असलेल्या नावांवर फुली मारत भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव रविवारी जाहीर केले. त्यांचा शपथविधी आज, सोमवारी दुपारी होईल.

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. पटेल एकटेच सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणि वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले.

मावळते मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. १८२ सदस्यांच्या विधानसभेतील भाजपच्या ११२ पैकी बहुतांश आमदार या बैठकीत हजर होते, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी, त्याचबरोबर सरचिटणीस तरुण चुग बैठकीला उपस्थित होते.

भूपेंद्र पटेल हे २०१७च्या विधानसभा निवडणुकीत घाटलोडिया मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून निवडून आले होते. त्या निवडणुकीतील हे सर्वांत मोठे मताधिक्य होते.

पटेल हे स्थापत्य अभियांत्रिकीचे पदविकाधारक असून; २०१२मध्ये याच मतदारसंघातून निवडून आलेल्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्रिपदावर निवड करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभारी आहोत, असे भूपेंद्र पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मावळते मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्याबरोबर असतात, असेही पटेल म्हणाले.

नगरसेवक ते मुख्यमंत्री

– मृदुभाषी, हसतमुख अशी ओळख असलेले आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारे भूपेंद्र पटेल २०१७मध्ये अहमदाबादमधील घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले.

– भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात.

– पटेल यांनी महापालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांनी अहमदाबाद नगरविकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्याआधी ते अहमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

– स्थापत्य अभियांत्रिकीचे पदविकाधारक असलेले ५९ वर्षीय पटेल पाटीदार समाजाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी काम करणाऱ्या ‘सरदारधाम विश्व पाटीदार केंद्रां’चे विश्वस्तही आहेत.

आज शपथविधी

’गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा आज, सोमवारी दुपारी होणार आहे.

’गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली.

’यावेळी त्यांच्या बरोबर मावळते मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील हेही होते.

‘रिमोट कंट्रोल’ आनंदीबेन यांच्याकडे : काँग्रेस आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केल्याने काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. पटेल यांची निवड केल्यामुळे गुजरात सरकार आता आनंदीबेन पटेल ‘रिमोट कंट्रोल’द्वारे चालवतील, असा टोला काँग्रेसने लगावला. भूपेंद्र हे भाजपचे गुजरातमधील शेवटचे मुख्यमंत्री ठरणार असून, जनतेने पुढील २५ वर्षे तरी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा निर्धार केला आहे, असे काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 1:30 am

Web Title: bjp will field bhupendra patel for the post of gujarat chief minister akp 94
Next Stories
1 उसदरवाढीसाठी वरुण गांधी यांचे योगींना पत्र
2 काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी शहीद
3 उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट
Just Now!
X