लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
ते म्हणाले, आतापर्यंत झालेल्या सर्वच सर्वेक्षणांमध्ये भाजप स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा मला विश्वास आहे. जयपूरमध्ये पक्षाच्या कार्यशाळेसाठी आले असताना राजनाथसिंग यांनी आपले विचार मांडले.
केंद्रातील सत्ता जाणार हे लक्षात आल्यावर कॉंग्रेसनेच समाजात फूट पाडण्याचे राजकारण सुरू केले असून, त्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे राजनाथसिंग म्हणाले. ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतके वर्ष कॉंग्रेस देशात सत्तेवर आहे. मात्र, सामाजिक सलोखा राखण्यासाठी काहीही न करता त्यांनी द्वेषाचे राजकारण केले. त्याच आधारावर त्यांना पुन्हा सत्ता मिळवायची आहे. कॉंग्रेसने जातीय हिंसाचार विधेयक आणले आहे. कोणतीही व्यक्ती दोषी आहे की नाही, हे तिच्या जातीच्या आधारावर ठरविणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न राजनाथसिंग यांनी उपस्थित केला.