भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आज नव्या हातांमध्ये जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार असून, यासंदर्भातील कार्यक्रम भाजपाने जाहीर केला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास भाजपाच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं वृत्त असून, त्यामुळे आजच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

अमित शाह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर भाजपाच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. अमित शाह यांच्या मदतीसाठी कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक केल्यानंतर ही चर्चा थांबली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधा मोहन सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार भाजपाच्या मुख्यालयात निवडणुकीचा कार्यक्रम होणार असून, अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ १० ते १२:३० अशी आहे. त्यानंतर १२:३० ते १:३० वाजेपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर १:३० ते २:३० हा अर्ज मागे घेण्याचा वेळ आहे. माहितीप्रमाणे अध्यक्षपदासाठी कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा हे अर्ज साडेदहा वाजता दाखल करणार आहेत. नड्डा यांचंच नाव चर्चेत असून, त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणाही आजच होऊ शकते. नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य अमित शाह, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी घोषणा करतील. त्यानंतर हा प्रस्ताव भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांकडे मांडला जाईल, असं वृत्त आहे.

अमित शाह यांनी केली होती मोदींना विनंती-

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अध्यक्षपदाची सूत्रे अमित शाह यांच्याकडे ठेवत भाजपानं कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची नियुक्ती केली होती. केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहिलं होतं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंती शाह यांनी केली होती.