खासदारांना मतदारसंघात मुक्कामी प्रवास करण्याचे शहांचे आदेश
लोकसभा निवडणूक उलटून वीस महिने झाले असले तरी भारतीय जनता पक्ष प्रचारातून अद्याप बाहेर आलेला नाही. देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांना आपापल्या क्षेत्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवासी प्रवास करण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिला आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांचा एकाच वेळी प्रवासाचा कार्यक्रम आखावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार प्रत्येक खासदारास राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी पत्र पाठवले आहे. या पत्रास खासदारांनी थंड प्रतिसाद दिला आहे.
विजयवर्गीय यांनी पाठवलेल्या पत्रानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात खासदारांना मुक्कामी प्रवास करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु शंभर खासदारांनी मुक्कामी प्रवासच केलेला नाही. आता विजयवर्गीय अशा खासदारांना ‘कारणे दाखवा’ पत्र पाठवणार आहेत. खासदारांनी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक, पक्ष विस्तारावर चर्चा, विकासकामांची चर्चा करणे अपेक्षित होते. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारे पत्रक, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यावरही भर देण्यात आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट व चर्चा करण्याची तंबी या पत्रातून देण्यात आली आहे. अमित शहा यांच्याविषयी असलेली नाराजी दूर करण्यासाठी हा प्रयत्न भाजपने केंद्रीय स्तरावरून आरंभला आहे.

खासदारांना आदेश..
२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आत्तापासून सुरू केली आहे. म्हणजे ज्या मतदारसंघात भाजप खासदार नाही, अशा ठिकाणी खासदारांना फेब्रुवारीपासून दोन दिवस मुक्कामी प्रवास करावा लागेल. कोणत्या खासदाराने कुठे जावे, याचे नियोजन केंद्रीय कार्यालयातून केले जाईल. सोशल मीडियावरून प्रचार व पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकासकामांची माहिती प्रत्येक ठिकाणी खासदारांना सांगण्याचा सूचनावजा आदेशच या पत्रातून देण्यात आला आहे.