आसामला भाजप पुन्हा घुसखोरांचे केंद्र बनू देणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी येथील प्रचारसभेत एआययुडीएफचे प्रमुख बद्दुद्दीन अजमल यांना दिला. आसामात गेल्यावेळी भाजप सत्तेत आल्यानंतर घुसखोरांनी बळकावलेली जमीन गेल्या पाच वर्षात मुक्त केल्याचा दावा त्यांनी केला.

अजमल यांना लक्ष्य करताना त्यांनी सांगितले, की पुढच्या सरकारची कुलूप किल्ली (एआययुडीएफचे निवडणूक चिन्ह) आमच्या हातात आहे असा दावा अजमल यांनी केला असला तरी आसाममध्ये कुणाची राजवट येणार हे लोकांनी आधीच ठरवलेले आहे. आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही असे त्यांनी चिरंग जिल्ह््यातील  बिजनी येथे सांगितले. हा भाग बोडो भूमी प्रादेशिक विभागात येतो. अजमल यांनी आसामच्या सत्तेची कुलूप किल्ली त्यांच्या हातात असल्याचे म्हटले असले तरी ही कुलूप किल्ली जनतेच्या हातात आहे असे शहा यांनी स्पष्ट केले.

अनेक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला घुसखोरी रोखता आली नाही पण आम्ही पाच वर्षात ती रोखली तसेच घुसखोरांनी व्यापलेल्या जमिनी मुक्त केल्या. आम्हाला आणखी पाच वर्षे द्या एकही घुसखोर येणार नाही, असे शहा यांनी सांगितले.

वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव, भारतरत्न गोपीनाथ बोर्डोलोई, भूपेन हजारिका ही आसामची खरी ओळख आहे. ती अजमल व काँग्रेस पुसू शकणार नाही. भाजपचे दोन इंजिनाचे सरकार आहे केंद्रात मोदी व राज्यात सोनोवाल असल्यानेच राज्यात हिंसाचाराचा बिमोड झाला. राज्यातील आंदोलने संपली. राज्य विकासाच्या दिशेने जात आहे, असेही शहा म्हणाले. शहा यांनी सांगितले, की पाच वर्षांपूर्वी पक्षाध्यक्ष म्हणून आलो होतो व आसामला हिंसाचार व आंदोलनमुक्त करून विकासाकडे नेण्याचे आश्वासन दिले ते पूर्ण केले. काँग्रेसने बंडखोरीचा प्रश्न सोडवला नाही. त्यातून अनेक लोकांना बळी जावे लागले. पंतप्रधान मोदी यांनी बोडो करारात पुढाकार घेऊन स्थायी शांतता करार केला. या करारातील कलमे २०२२ पर्यंत पूर्णत्वास जातील.