भाजपाने गुजरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी करत, मंगळवारी सर्व आठ जागांवर विजय मिळवला आहे. तर, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेच्या वाट्याला एकही जागा आली नाही.

आज सकाळपासूनच सुरू झालेल्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतल्याने, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष देखील करत होते.

या निकालावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले की, पोटनिवडणुकीचा निकाल हा आगामी काळातील स्थानिक निवडणुकांसह २०२२ मधील विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे. तसेच, काँग्रेस हे बुडते जहाज आहे, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. असं देखील रुपाणी यांनी म्हटलं आहे.

तर, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले की, जनतेने सरकारच्या कामावर विश्वास दाखवत, पोटनिवडणुकीत सर्व आठ जागांवर विजय मिळवून दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच भाजपाचा विजय निश्चित होता. गुजरातमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संकटात आहे. काँग्रेस नेते चुकीची वक्तव्य करून सरकार व भाजपा नेत्यांना बदनामा करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते.