जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्यांत भाजपचा विचार रुजविण्यासाठी भाजप महिला शाखेने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. या राज्यांतील महिलांशी संपर्क आणि संवाद साधून भाजपचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्णय झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपला प्रथमच सहापैकी तीन जागा मिळाल्या आहेत. लडाखमध्ये तर प्रथमच पक्षाचा विजय झाला आहे. ईशान्य भारतातही पक्षाला आठ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे तेथे पक्षाचा विस्तार व्हावा या हेतूने आम्ही अनेक कार्यक्रम आखले आहेत, असे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सरोज पांडे यांनी सांगितले. दक्षिणेकडील राज्यांतही महिला मोर्चा काम जोमाने सुरू करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
विभाग आणि पंचायत पातळीवर बैठका, घरोघरी संपर्क, तेथील महिलांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या सोडवणुकीचे उपाय निश्चित करणे तसेच त्यांना आधार देणे, अशी भाजप महिला मोर्चाची मोहीम आहे, असे त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या चार राज्यांवरही ‘महिला मोर्चा’चे लक्ष राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.