ललित मोदी प्रकरणामुळे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे तसेच स्मृती इराणी यांच्याविरोधात दिवसेंदिवस आक्रमक होणाऱ्या काँग्रेसमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षासमोरच्या संकटात भर पडत आहे. काँग्रेसने स्वराज व राजे यांच्याविरोधात दररोज पत्रकार परिषदांचा सपाटा लावला असताना भाजप गोटात शांतता पसरली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यावर दिल्लीच्या पारंपरिक राजकारणाला छेद दिला असला तरी वसुंधरा राजे यांनी मात्र त्यांना अद्याप महत्त्व दिलेले नाही. आयपीएल स्पर्धेत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात पळपुटा आरोपी असलेल्या ललित मोदीचा मदत स्वराज व राजे यांनी केल्याने स्पष्टीकरण देताना भाजप नेत्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे स्वराज व राजे यांची पाठराखण करण्याची रणनीती असली तरी राष्ट्रीय स्तरावर फारसे महत्त्व नसलेल्या नेत्यांनाच त्यासाठी पुढे करण्यात येत आहे. राजीनामा घेतल्यास राजे बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने ‘राणीसाहेबांना’ आदेश देण्याची हिंमत अमित शहा अद्याप दाखवू शकलेले नाहीत.
bjp-nari
विरोधी पक्षनेत्या असताना वसुंधरा राजे यांनी ब्रिटन सरकारला पत्र लिहून ललित मोदी यांची पाठराखण केली होती. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यावर ते आपण लिहिलेच नव्हते, असा बचावात्मक पवित्रा राजे यांनी घेतला. प्रत्यक्षात या पत्रावर राजे यांचीच स्वाक्षरी आहे. त्यामुळे यावर कोणतेही स्पष्टीकरण न घेता राजे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यावर भाजपाध्यक्ष अमित शहा ठाम होते. स्वराज यांच्याविरोधात पक्षातूनच रसद पुरविण्यात आल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. स्वराज व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सख्य नाही. त्याच वादातून स्वराज यांनी ललित मोदी यांच्यासाठी केलेल्या ‘ई मेल्स’ लिक करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. स्वराज व राजे यांच्याविरोधात तापलेल्या वातावरणात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची ‘इयत्ता’ ठरविणाऱ्या याचिकेवर सुनावणी करता येण्याइतपत तथ्यांश असल्याचे न्यायालयाने म्हटले. त्यामुळे विरोधकांनीइराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे अधिवेशनापूर्वी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

नेतृत्वबदल कठीण
राजे यांनी राजीनामा घेतल्यास बंडखोरीची धमकी दिल्याने शहा यांनी माघार घेतली. एकीकडे राजस्थानमधील सरकार वाचवायचे की ‘भ्रष्टाचार खपवून घेणार नाही’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला जपायचे, अशा विवंचनेत अमित शहा आहे. राजस्थानमधील घडामोडींवर शहा यांनी राजस्थानमधील राज्यसभा खासदार व बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. या चर्चेतून काहीही निष्पन्न झालेले नाही.