पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत 2 जागा जिंकणाऱ्या भाजपाने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसच्या हाती केवळ एकच जागा आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चाणक्य नितीचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच भाजपा शाह यांच्या मिशन-23 च्या जवळ पोहोचली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीपूर्वीच केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच शाह यांनी पश्चिम बंगालकडेही आपला मोर्चा वळवला होता. त्यातच उत्तर प्रदेशातील सभांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या होत्या. तर अमित शाह यांनीदेखील 11 सभा घेतल्या होत्या. हिंदुत्व आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे भाजपाने उचलून धरले होते. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जनता नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अमित शाह यांनी लोकसभेच्या 543 जागांसाठी पक्षाकडून 600 कार्यकर्त्यांना पूर्णवेळ कामासाठी नियुक्त केले होते. त्यापैकी 543 जणांवर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपाचा जोर नाही अशा जागांसाठी 5-5 सुपरवायझरही नियुक्त करण्यात आले होते. तसेच साडेतीन लाख कार्यकर्त्यांनी एकत्रित दीन दयाल विस्तारक योजनेअंतर्गत पक्षाच्या सक्षमीकरणासाठी बूथ लेवलवर काम केले होते. तसेच 4 हजार कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत पूर्ण वेळ वॉलेंटियर्स म्हणूनही काम सोपवण्यात आले होते.

ज्या ठिकाणी भाजपाची पकड कमी होती, अशा 120 पेक्षा अधिक जागांवर शाह यांनी विशेष लक्ष दिले होते. या जागांचा शाह यांनी विशेष आढावा घेतला होता. तसेच त्यांनी केंद्रीय युनिटशी जोडलेल्या 19 विभागांच्या कामांवरही विशेष लक्ष दिले होते. याच शाह’निती’चा फायदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये झाला आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर विजय मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले गेले. तसेच झारंखडला लागून असलेल्या बाकुंडा, पुरूलिया आणि झाडग्राम या भागांमध्ये भाजपाने उत्तम प्रदर्शन केले. तर उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि अलीपुरदुआरसारख्या जागांवरही भाजपाला यश मिळाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp won 18 seats in wb lok sabha amit shah mission 23 success
First published on: 24-05-2019 at 10:03 IST