होळीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीत भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळणाऱ्याला विरोध केल्याने ही हत्या करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. राजू राजभर असं या ३५ वर्षीय भाजपा कार्यकर्त्याचं नाव आहे.

राजू राजभर यांचं परिसरातील काहीजणांसोबत शत्रुत्व होतं. हे सर्वजण राजू राजभर यांच्या पत्नीसोबत जबरदस्तीने होळी साजरी करत होते. राजू राजभर यांनी विरोध केला असताना तब्बल २० जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये इतर चारजण जखमी झाले आहेत.

गावकऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीसोबत होळी साजरी करण्यावरुनच राजू आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. अनेक भाजपा कार्यकर्ते राजू यांच्या घऱी होळी साजरी कऱण्यासाठी आले होते. यानंतर आरोपींनी राजू यांना धडा शिकवण्याचं ठरवलं. २० जणांनी मिळून राजू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काठ्या आणि रॉडने हल्ला केला. यामध्ये राजू राजभर यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राजू राजभर यांच्यामागे पत्नी आणि तीन लहान मुलं असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. राजू राजभर यांच्या घऱाबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते जमा झाले होते. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी ते करत होते. यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पोलिसांनी याप्रकरणी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथकं तयार करण्यात आली आहेत.