वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने चांगलाच चोप दिल्याची घटना शनिवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे घडली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीला आक्षेपार्ह मेसेज पाठवणारा भाजपा कार्यकर्ता मुळचा सितारगंज येथील रहिवासी असून तो सध्या रुद्रपूर येथील मेट्रोपोलिस रेसिडन्ट वेलफेअर सोसायटी येथे आपल्या कुटुंबासह राहतो. पीडित महिलेने या सोसायटीच्या अध्यक्षांना भेटून त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर सोसायटीच्या अध्यक्षांसह ती महिला आरोपी कार्यकर्त्यांच्या घरी गेली. तेथे गेल्यानंतर त्याला त्याने केलेल्या कृत्याबाबत समज देण्यात आली. मात्र, त्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह महिलोसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर चिडलेल्या या महिलेने थेट आपल्या पायातली चप्पल काढली आणि त्या भाजपा कार्यकर्त्याला चांगलाच चोप दिला.

या घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घराच्या दारात आलेले पाहताच संबंधित भाजपा कार्यकर्त्याने आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची माफी मागितली, त्यानंतर महिलेने त्याला सोडून दिले. त्यामुळे पोलिसांनीही त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पीडित महिलेचा पोलीस अधिकारी पती उत्तर प्रदेशात कर्तव्यावर आहे. या पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमांशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे कृत्य केल्यानंतर ते अडचणीचे ठरते. त्यामुळे पक्षाच्या इमेजलाही धक्का पोहोचतो. या घटनेची चौकशी करुन पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्थानिक भाजपा नेते आणि आमदार राजकुमार तसेच भाजपा शहराध्यक्षांनी म्हटले आहे.