जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली. एवढच नाहीतर पीडपी कार्यालवर देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. याशिवाय, लाल चौकातील क्लॉक टॉवरवर ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या, भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

१४ महिने स्थानबद्धतेत राहिल्यानंतर बाहेर पडलेल्या पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या हातातील जम्मू-काश्मीरचा झेंडा दाखवत, ‘जोपर्यंत हा झेंडा परत येत नाही तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही असं म्हटलं होतं. ”जोपर्यंत आम्हाला आमचा झेंडा परत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताच झेंडा फडकवणार नाही. आमचा झेंडाच तिरंग्याबरोबरच आमच्या संबंधांचा मुख्य दुवा होता.”, असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. यावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा- …तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही : मेहबुबा मुफ्ती

आणखी वाचा- धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील – फारुख अब्दुल्ला

मुफ्तींच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत भाजपाकडून तिंरागा रॅली काढली गेली. शिवाय, मुफ्ती यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. या अगोदर शनिवारी देखील मुफ्तींच्या कार्यालयाबाहेर तिरंगा ध्वज फडकवला होता. त्यावेळी पीडपी कार्यकर्त्यांबरोबर भाजपा कार्यकर्त्यांची बाचाबाची व झटापट झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. एकूणच मुफ्तींनी केलेल्या या विधानामुळे आता जम्मू-काश्मीरचे राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे.